"मानवधर्म" म्हणजे काय?
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी मानवधर्माची स्थापना १९४९ साली फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात महाशिवरात्रीच्या पर्वावर केली. मानवधर्माचा मुख्य उद्देश मानवाने मानवासारखे वागावे हा आहे. या धर्माची शिकवण म्हणून मानवाला भगवत प्राप्तीसाठी, निष्काम कर्मयोग साधण्याकरिता, त्यांच्या आयुष्यात वागण्याकरिता बाबांनी चार तत्त्व, तीन शब्द आणि पाच नियम दिले आहेत.
चार तत्व
१) परमात्मा एक
२) मरे या जिये भगवत् नामपर
३) दुःखदारी दूर करते हुये उद्धार
४) इच्छा अनुसार भोजन
तीन शब्द
१) सत्य बोलणे
२) मर्यादा पाळणे
३) प्रेमाने वागणे
पाच नियम
१) ध्येयाने एक भगवंत मानणे.
२) सत्य, मर्यादा व प्रेम सेवकांत तसेच कुटुंबात कायम करणे...
३) अनेक वाईट व्यसने बंद करणे.
(दारू, टॉनिक, सट्टा, जुवा, लॉटरी, कोंबड्याची काती, चोरी करणे,
• खोटे बोलणे, राग आणणे बंद करणे. स्त्रियांनी मुलांना आणि पतिदेवाला वाईट शब्दांत बोलू नये. याशिवाय मानव जीवन खाली आणणारे कोणतेही वाईट व्यसन बंद करणे.)
४) कुटुंबात व सेवकांत एकता कायम करणे.
५) मानव मंदिर सजविण्याकरिता दान देणे.
(आपले कुटुंब मर्यादित ठेवणे.)
मानवाने भगवंताच्या चरणावर मरून त्याला उभे केले पाहिजे आणि त्याने सर्व कार्य भगवंताला समोर ठेवून केले तर तो नेहमी सुखी आणि समाधानी राहू शकतो.
बाबांनी या मार्गात एकच परमेश्वर मानला आहे. बाबा हनुमानजी हे महान्त्यागी बाबा जुमदेवजी यांचे गुरू आहेत. त्यांनीच बाबांना एका परमेश्वराची ओळख करून दिली. परंतु बाबा हनुमानजी हे या मार्गाचे परमेश्वर नाहीत. परमेश्वर ही व्यक्ती नसून चोवीस तास जागृत असणारी दैवी शक्ती आहे. ती निराकार आणि चैतन्यमय आहे. प्रत्येकाच्या आत्म्यात ती शक्ती विराजमान आहे. म्हणून प्रत्येक मानव हा चैतन्य आहे. या दैवी शक्तीला आकारात दाखविता येत नाही तर बाबांनी दिलेल्या तत्त्व, विश्वास आणि त्याग यामुळे ती आकारात दाखविता येते म्हणजेच त्याचे गुण दिसतात.
वंशपरंपरेनुसार रूढिवादाप्रमाणे या मार्गाची दीक्षा घ्यायच्या अगोदर सर्व देव-देवतांचे विसर्जन करावे लागते. तेव्हाच परमेश्वर पाठीशी उभा राहतो. मूर्तिपूजा बंद करावी लागते, श्री संत तुलसीदासांनी म्हटले आहे की, पत्थर पूजे भगवान मिले तो मै पूजूँ पहार' या म्हणीप्रमाणे बाबा नेहमी सांगतात की भगवंत निर्जीव वस्तूमध्ये वास करीत नाही तर तो सजीव वस्तूंमध्ये वास करतो. त्यामुळे त्याचा आत्मा हा चैतन्य असतो. परमेश्वराने बाबांना त्यांच्या आत्म्यात आपली ओळख करून दिली आहे. म्हणून बाबा हे प्रत्येक मानवाच्या आत्म्यात परमेश्वर पाहतात. जो चोवीसतास त्याचे जीवन चैतन्यमय बनवितो. म्हणून बाबा स्वतःचा आत्मा आणि दुसऱ्याचा आत्मा सारखाच आहे असे समजून कोणालाही आपल्या पाया पडू देत नाहीत कारण एका आत्म्यापुढे दुसरा आत्मा झुकेल. त्यामुळे आत्म्याचा अपमान होईल आणि पर्यायाने परमेश्वराचा अपमान होईल असे ते समजतात. कारण आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे. हीच शिकवण त्यांनी मानवाला (सेवकाला) दिली आहे. या मार्गातील सेवकाला कोणत्याही देवळात नमस्कार करता येत नाही. तसेच तांत्रिक मांत्रिक यांचाही उपचार करता येत नाही. किंबहुना या तांत्रिक मांत्रिकांचा इलाज या मार्गातील सेवकांवर चालत नाही. अनेक वाईट व्यसने बंद करावी लागतात. दारू पिणाऱ्याला घरात प्रवेश देता येत नाही. दारू पिणारा घरात आला तर त्या घरात दुःख निर्माण होते.
मानवाने सर्वांबरोबर सत्य, मर्यादा आणि प्रेमाने वागले पाहिजे. त्याने त्याच्यातील मोह, माया आणि अहंकार नष्ट करायला पाहिजे. त्याने निष्काम भावनेने कार्य करावे. दुसऱ्याच्या स्वार्थात स्वतःचा स्वार्थ साधावा. आपल्या स्वार्थाकरिता दुसऱ्याचे नुकसान करू नये. 'अपनी अपनी करनी उतरो पार, बापबेटेका कौन विचार' या म्हणीप्रमाणे प्रत्येकाने आपले कर्तव्य करून त्याचे परिणाम आपणच भोगावे. वडिल मुलाकरिता किंवा मुलगा वडिलांकरिता, केलेल्या कार्याचे परिणाम भोगत नाही म्हणजे प्रत्येकाने स्वतःच्या बाबतीतच विचार करायला पाहिजे. प्रत्येक जण जसे कर्तव्य करतो तसेच त्याला फळ मिळते. प्रसंग पडल्यास कोणी कोणाला साथ देत नाही. म्हणून प्रत्येक मानवाने स्वावलंबी बनणे आवश्यक आहे. त्याने निष्काम सेवा करावयास हवी.
'असेल माझा हरी तर देईल पलंगावरी' ही तुकाराम- महाराजांची म्हण या मार्गात खोटी ठरली आहे. येथे नुसता देव देव करून चालत नाही. देव मानवाला साहाय्य करीत नाही. आपल्या कर्तृत्वानुसार आपल्याला फळ मिळत असते. त्यामुळे कर्तृत्वच श्रेष्ठ मानल्या गेले आहे. स्वतः नुसते कर्तृत्व करावे पण त्याच्या फळाची आशा करू नये बाबांनी दिलेल्या तत्त्व, शब्द आणि नियमाप्रमाणे कर्तव्य केले तर त्याला परमेश्वर साथ देतो आणि त्याचे चांगलेच फळ त्याला चाखायला मिळते. म्हणून देव देव म्हणून नुसते भजन करू नये. त्यामुळे त्याला दैनंदिन गरजा पूर्ण करता येत नाहीत आणि त्याचे जीवनमान सुद्धा उंचावणार नाही.
या मार्गाची दीक्षा घेताना दीक्षा घेणारा स्वतःच परमेश्वराची आराधना करतो आणि त्याचे गुण पाहतो. बाबा त्याला फक्त मार्गदर्शन करतात. दीक्षा घेणाऱ्याला स्वतःच आराधना करून स्वतःच परमेश्वराचे चमत्कार पाहावे लागतात. हा मार्ग स्वीकारल्यावर स्वतःच हवन करावे लागते. दुसऱ्या कोणालाही हवन करता येत नाही. या मार्गात परमेश्वराने सेवकांच्या भावना संपवलेल्या आहेत. सेवकाने जर एखाद्या दुःखी आणि कष्टी माणसाला तीर्थ करून दिले तर त्याचे दुःख क्षणातच दूर होते. मानव हा त्यागी असला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक सेवक कोणत्याही देव-देवतांपेक्षा कमी नाही. तसेच या मार्गातील प्रत्येक नारी कोणत्याही देवीपेक्षा श्रेष्ठ आहे.
'आपल्यासारखे करिती तात्काळ, त्या काळवेळ न लागे' या म्हणीप्रमाणे बाबांनी प्रत्येक सेवकाला स्वावलंबी, निःस्वार्थ आणि त्यागी बनविले असून निष्काम सेवा करण्याचे धडे शिकविले आहेत. त्यागामुळे परमेश्वर लवकर प्राप्त होतो. म्हणून या मार्गातील प्रत्येक सेवक इतरांचे दुःख झटकन नाहीसे करतो.
'मानव धर्म' या मार्गात फक्त दोन जाती आहेत. नर आणि नारी याशिवाय या मार्गात दुसरी कोणतीही जात-पात नाही. यापूर्वी ज्या जाती निर्माण झाल्यात त्या जातींना येथे स्थान नाही. येथे फक्त एकच धर्म आहे आणि तो म्हणजे 'मानव धर्म. कारण परमेश्वराला हव्या असलेल्या सत्य, मर्यादा आणि प्रेमपूर्ण वागणूक यासाठी मानवाला कार्य करायचे आहे मर्यादित कुटुंब, व्यसनमुक्ती, शुद्ध मन, स्वच्छ शरीर, शुद्ध वागणूक, स्वच्छ कपडे, साधी राहणी, उदात्त विचार आणि त्यागमय जीवन इत्यादी गोष्टी या मार्गाची शिकवण आहे.
तत्त्व, निश्चय आणि त्यागाने परमेश्वर मानवाजवळ असतो. तत्त्वाने निष्काम कर्मयोग साधला जातो. निश्चयाने विश्वास वाढतो, तर त्यागाने धैर्य वाढते या मार्गात भावनेला मुळीच स्थान नाही.
या मार्गाचे निशाण हे देशाचे 'निशाण' आहे. प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे की, त्याने ज्या भूमीवर जन्म घेतला असेल ती त्याची कर्मभूमी मानली पाहिजे आणि त्याबद्दल त्याला अभिमान असला पाहिजे. त्याकरिता तिचे रक्षण करणे हे त्याचे आद्य कर्तव्य आहे.
'आपली सोडवणूक करावी आपणच' या म्हणीप्रमाणे या मार्गातील प्रत्येक सेवक त्याला येणाऱ्या दुःखापासून स्वतःला सोडवतो. मानव हा कार्य करणारा प्राणी आहे. तो कार्य करताना चुकतो आणि त्या चुकीमुळे त्याच्यावर दुःख येते. या दुःखातून मुक्त होण्याकरिता त्याला पुन्हा भगवंताजवळ आपली चूक कबूल करावी लागते. पुन्हा चूक करणार नाही असे वचन द्यावे लागते; कारण मानव हा क्षमेला पात्र आहे. वरील म्हणीप्रमाणे भगवंत त्याला क्षमा करून दुःखातून मुक्त करतो.
या मार्गात असाध्य रोग, उदाहरण. टी.बी., कॅन्सर, कोड इत्यादी साध्य होतात. जे संसर्गजन्य रोग आहेत तेही या मार्गात नष्ट झालेले आहेत. तसेच वंशपरंपरागत रोगही नष्ट होऊन पुन्हा त्या कुटुंबात ते रोग होत नाहीत. याची अनेक उदाहरणे या मार्गातील सेवकांना आलेल्या अनुभवावरून आहेत.
नमस्कार...
( टिप :- ही माहिती कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )
वरिल माहिती मानवधर्म परिचय पुस्तिक ( मराठी ) पाचवी आवृत्ती मधील आहे.
सौजन्य :- सेवक एकता परिवार
परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर नागपूर
★ सेवक एकता परिवार ★
( Social Media Platform )
©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
https://www.facebook.com/SevakEktaParivar/
©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1
©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q
©️ सेवक एकता परिवार ( Sharechat )
https://sharechat.com/profile/sevakektaparivar?d=n
©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/
No comments:
Post a Comment